केजरीवाल यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय कारकिर्दीवर मद्य धोरण घोटाळ्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरूवारी केला. ईडीने संबंधित घोटाळ्यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे.
घोटाळ्यातून आपला १०० कोटी रूपयांचा आर्थिक लाभ मिळाला. त्यातील काही पैशांचा वापर केजरीवाल यांनी गोव्यातील लक्झरी हॉटेलमध्ये राहण्यासाठी केला, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यावर वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली. केजरीवाल आणि आपने त्यांच्या अप्रामाणिकपणातून दिल्लीत अराजक पसरवले. त्यामुळे प्रत्येक दिल्लीकराच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने मोठमोडी आश्वासने दिली. पण, ते एक आश्वासनही पूर्ण करू शकले नाहीत. ते दिल्लीला सुरळित पाणीपुरवठा करू शकले नाहीत. त्यांचा सर्व फोकस मद्यावर होता. मद्य धोरण घोटाळ्याविषयी आपल्याविरोधात पुरावा नसल्याचे केजरीवाल सातत्याने म्हणायचे. मात्र, ईडीने न्यायालयांपुढे पुरावा सादर केला आहे, असे ते म्हणाले.




