Qualcomm Layoffs: क्वॉलकॉममध्ये मोठी नोकरकपात! भारतातील 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट
Qualcomm Layoffs : अमेरिकेच्या क्वॉलकॉम कंपनीने भारतात 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कपातीची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त आहे. बेंगळुरू, हैदराबादसह दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईमध्येही परिणाम होण्याची शक्यता. सेवरन्स पॅकेज किती मिळणार?

Qualcomm Layoffs: अमेरिकेतील आघाडीची चिप उत्पादक कंपनी क्वॉलकॉमने भारतात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू केली आहे. या निर्णयाचा देशातील 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, बेंगळुरू आणि हैदराबाद येथील कार्यालयांमधून कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. आगामी काळात दिल्ली-एनसीआर आणि चेन्नई येथील कंपनीच्या संशोधन आणि अभियांत्रिकी केंद्रांमध्येही याचा परिणाम दिसू शकतो. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून ही प्रक्रिया सुरू असून, 9 नोव्हेंबरपासून तिला वेग आल्याचे वृत्त आहे.
भारतातील 5 ते 6 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम?
क्वॉलकॉममध्ये भारतात सध्या सुमारे 20 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच कंपनीतील सुमारे 5 ते 6 टक्के कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. मात्र, कंपनीने अद्याप कर्मचारी कपातीची अधिकृत संख्या जाहीर केलेली नाही.
क्वॉलकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टियानो अमोन यांनी 20 ऑक्टोबर रोजी जगभरातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची योजना जाहीर केली होती. भारतातील कर्मचारी कपात हा त्याच पुनर्रचनेच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
कर्मचाऱ्यांना किती मिळणार सेवरन्स पॅकेज?
नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून तीन ते पाच महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम देण्याची तयारी असल्याची माहिती आहे. याशिवाय, संबंधित कर्मचाऱ्याने कंपनीत किती वर्षे काम केले आहे, यावर आधारित अतिरिक्त पैसेही दिले जाऊ शकतात.
विशेष म्हणजे, नोकरी सोडण्यासंबंधीची कागदपत्रे तीन दिवसांच्या आत पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एका महिन्याचा पगार देण्याची ऑफर असल्याचे वृत्त आहे. मात्र, या पॅकेजसंदर्भात कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
चांगली कामगिरी करणाऱ्या वरिष्ठ अभियंत्यांनाही फटका
या कर्मचारी कपातीमध्ये अनुभवी अभियंते आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मनीकंट्रोलशी बोलताना काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, चांगली कामगिरी आणि सातत्याने उत्तम रेटिंग मिळूनही त्यांना नोकरी सोडण्यास सांगण्यात आले.
त्यामुळे केवळ कामगिरीच्या आधारावर कर्मचारी कपातीचे निर्णय घेतले जात नसल्याची नाराजी काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कंपनीतील कामाचा अनुभव, कामगिरी आणि बोनसच्या स्वरूपात काही आर्थिक मदत मिळत असली, तरी कपातीची पद्धत योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कर्मचारी कपातीसाठी वैयक्तिक कामगिरीचे मूल्यांकन, संपूर्ण टीमची कामगिरी आणि अमेरिकेतील वरिष्ठ व्यवस्थापनाचे निर्णय विचारात घेतले गेले असावेत. रेडिओ फ्रिक्वेन्सी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि जीएनएसएस (GNSS) तंत्रज्ञानाशी संबंधित विभागांतील कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन बाजारातील मंदीमुळे कंपनीसमोर आव्हान
जगभरातील स्मार्टफोन बाजारात वाढत्या अडचणींचा परिणाम क्वॉलकॉमच्या व्यवसायावर होत आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात स्मार्टफोन व्यवसायाचा वाटा सुमारे 51 टक्के आहे. दुसरीकडे, चिप निर्मिती क्षेत्रातील मीडियाटेक कंपनीकडून वाढती स्पर्धा आणि अॅपलने स्वतःचे मॉडेम तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केल्यामुळे क्वॉलकॉमसमोरील आव्हाने वाढली आहेत.
या पार्श्वभूमीवर कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), वाहनांसाठीचे तंत्रज्ञान, इंटरनेटशी जोडलेली उपकरणे आणि डेटा सेंटरसाठी लागणाऱ्या चिप्स या क्षेत्रांत व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे.
टेकआर्कचे संस्थापक फैजल कवूसा यांच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये भारतातील स्मार्टफोन विक्रीच्या संख्येत 26 ते 28 टक्के, तर विक्रीच्या एकूण मूल्यामध्ये 7 ते 8 टक्क्यांची घट होऊ शकते. क्वॉलकॉमला वाहन तंत्रज्ञान क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यासाठी वेळ लागणार आहे. पुढील तीन ते पाच वर्षांत कंपनीच्या एकूण उत्पन्नातील या व्यवसायाचा वाटा 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.





