PV Sindhu Defeat : विश्व बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूला मोठा धक्का! चीनच्या वांग झी ईकडून पहिल्यादाच पराभव
PV Sindhu Defeat : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती स्टार शटलर पीव्ही सिंधूला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

PV Sindhu Defeat BWF World Badminton Championships Wang Zhi Yi Pre Quarter Final : बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद (BWF World Championships) स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनल (राउंड ऑफ १६) फेरीत भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती स्टार शटलर पीव्ही सिंधूला (PV Sindhu) धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या आणि रोमहर्षक लढतीत चीनच्या तिसऱ्या मानांकित वांग झी ईने (Wang Zhi Yi) सिंधूचा २१-११, १५-२१, २१-१७ अशा तीन सेटच्या लढतीत पराभव केला. या पराभवासह स्पर्धेतील भारताचे सर्वात मोठे आव्हान संपुष्टात आले आहे.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत चिनी खेळाडूंविरुद्ध सिंधूचा पहिलाच पराभव –
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात चिनी खेळाडूंविरुद्ध पीव्ही सिंधूचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. या सामन्यापूर्वी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या खेळाडूंविरुद्ध सिंधूचा ट्रॅक रेकॉर्ड ८-० असा अजेय होता. तिने सलग आठ सामने जिंकून चिनी भिंतीला सुरुंग लावला होता. मात्र, वांग झी ईने कोर्टवर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सिंधूचा हा ऐतिहासिक विजयरथ अखेर रोखून दाखवला.
पहिल्या गेममधील पिछाडीनंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूचे पुनरागमन –
PV Sindhu disappointed with her loss and losing the momentum after the “INJURY” of Wang in the final 15 mins of the game. pic.twitter.com/NJZfvGrUiF
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) August 20, 2026
सामन्याच्या सुरुवातीला चिनी खेळाडूने पूर्ण वर्चस्व राखत पहिला गेम अवघ्या काही मिनिटांत २१-११ अशा मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत जोरदार पुनरागमन केले. उत्कृष्ट नेट प्ले आणि आक्रमक स्मॅशच्या जोरावर तिने दुसरा गेम २१-१५ असा खिशात घालत सामना १-१ अशा निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला.
५४ शॉट्सची मॅरेथॉन रॅली अन् अटीतटीचा पराभव!
निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी शर्थीची झुंज पाहायला मिळाली. स्नायूंच्या ताणाशी (Cramps) झुंजत असतानाही चिनी खेळाडूने हार मानली नाही. सामन्यात १८-१७ अशा अत्यंत नाजूक वळणावर तब्बल ५४ शॉट्सची दमछाक करणारी महा-रॅली रंगली. ही रॅली गमावल्यानंतर सिंधूचे नियंत्रण सुटले आणि वांगने २१-१७ ने गेम जिंकत सामना आपल्या नावावर केला. आता क्वार्टर फायनलमध्ये वांग झी ईचा सामना डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफरसेनविरुद्ध होणार आहे.





