वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात समझोता लवकरच होण्याची शक्यता आहे. रशिया, युक्रेन आणि अमेरिकेमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेतून एक तोडगा काढला जाण्याची शक्यता असल्याचे पुतीन यांचे विषेश दूत किरील दिमित्रेव यांनी म्हटले आहे. या चर्चेचा पाठपुरावा करण्यासाठी अमेरिकेत आले असताना त्यांनी ही शक्यता वर्तवली. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील बैठक रद्द झालेली नाही आणि दोन्ही नेते पुढच्या तारखेला भेटतील अशी शक्यता आहे, असे ते म्हणाले. रशियाने तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव नाकारल्यामुळे मंगळवारी बुडापेस्ट येथे होणारी दोन्ही नेत्यांमधील बैठक तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. यामुळे युद्धबंदीच्या प्रयत्नांवर गडद छाया पसरली आहे. मात्र आतापर्यंतच्या चर्चेच्या आधारे लवकरच तोडगा काढला जाईल, असे दिमित्रेव म्हणाले. मात्र चर्चेमध्ये काय प्रगती झाली आहे, याचा कोणताही तपशील त्यांनी दिला नाही. युद्धाच्या सद्यस्थितीच्या आधारे युरोपातील देशांकडून युद्धबंदीचा नवीन प्रस्ताव तयार केला जातो आहे. या युद्धबंदीच्या प्रस्तावामध्ये अमेरिकेची भूमिका महत्वाची असणार आहे. झेलेन्स्की यांनी आगोदर रशियाच्या सैन्याने युक्रेनमधून माघार घेण्याचा आग्रहधरला होता. मात्र आता त्यांच्या भूमिकेत बराच फरक पडला आहे. त्यामुळे युद्धबंदीचा तोडगा काढला जाऊ शकतो आहे, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी युक्रेनचा डोनबास प्रांत तोडून एक भाग रशियाला देऊन टाकण्याचा प्रस्ताव सुचवला होता. मात्र त्याला युरोपातल्या देशांनी आणि युक्रेननेही जोरदार विरोध केला होता. युरोप आणि युक्रेनच्या प्रतिनिधीत्वाशिवाय कोणतीही चर्चाच होऊ शकत नसल्याचे युरोपीय संघाने ट्रम्प यांना सुनावले होते.