पाश्चात्य देशांच्या रशियावरील निर्बंधांवर पुन्हा संतापले पुतीन; म्हणाले, ही मुर्खपणाचीच कृती

मॉस्को – अमेरिकेसह अन्य पाश्चात्य देशांनी रशियावर जे निर्बंध लागू केले आहेत त्यावर आज बऱ्याच दिवसांच्या अवधीनंतर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांची ही कृती अविचारी आणि मुर्खपणाची आहे. त्यांच्या या निर्बंधांचा रशियावर काहीही परिणाम होणार नाही. ज्यांनी हे निर्बंध जारी केले आहेत त्यांचेच यातून अधिक नुकसान होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सेंट पीट्सबर्ग येथील एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना ते म्हणाले की, एकट्या युरोपियन देशांच्या समुदायाचे या निर्बंधांमुळे किमान चारशे अब्ज डॉलर्सचे नुकसान होणार आहे. युरोपियन समुदायाने त्यांच्या देशातील लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून हे निर्बंध जारी केले आहेत. या समुदायातील 27 देशांमध्ये यामुळे मोठी महागाई वाढली आहे असेही पुतीन यांनी नमूद केले आहे.
दरम्यान अध्यक्ष पुतीन यांनी निर्बंध जारी करणाऱ्या देशांचेच यातून नुकसान होणार असल्याचे म्हटले असले तरी रशियाच्या अर्थतज्ज्ञांनीच या निर्बंधांमुळे रशियाचेही मोठे नुकसान होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्या इशाऱ्याकडे मात्र पुतीन यांनी दुर्लक्ष केले आहे.
रशियातील प्रमुख बॅंक असलेल्या सेंट्रल बॅंकेच्या प्रमुख श्रीमती नबीउल्लीना यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे रशियाचा पंधरा टक्के जीडीपी धोक्यात आला आहे. त्याची रिकव्हरी इतक्यात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आज जी आर्थिक सुरक्षेची स्थिती आहे तशी स्थिती येथील नागरीकांसाठी कायम राहणार नाही हेही लोकांनी लक्षात घेतले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
सन 2021 मध्ये रशियाची जी आर्थिक स्थिती होती त्या पातळीवर रशियाला पुन्हा येण्यासाठी आणखी काहीं दशके लागतील असा इशारा तेथील बॅंकर्सनही दिला आहे. पण पुतीन यांनी मात्र निर्बंधांमुळे रशियावर काहीही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.





