Pushkar Singh Dhami : उत्तराखंडमध्ये शहरी नक्षलवादी टोळ्यांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची टीका

डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे, परंतु शहरी नक्षलवादी टोळीतील काही सदस्य राज्यात जिहादी मानसिकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा दावा या राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केला. त्यांनी काहीही केले तरी सरकार अशा लोकांच्या योजना कधीही यशस्वी होऊ देणार नाही असेही त्यांनी ठामपणे म्हटले.
राज्यातील तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी आयोजित नियुक्ती पत्र वितरण समारंभात पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, राज्याच्या तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी सरकार सतत मोठे निर्णय घेत आहे आणि पुढेही असेच करत राहील. भाषणादरम्यान पेपर लीक प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनासाठी शहरी नक्षलवादी टोळीला जबाबदार धरले. ते म्हणाले की, सरकार तरुणांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी दृढनिश्चयाने काम करत आहे, परंतु काही शहरी नक्षलवादी टोळ्या राज्यात जिहादी मानसिकता वाढवण्याचे काम करत आहेत आणि सरकार त्यांच्या योजना कधीही यशस्वी होऊ देणार नाही.
भाषणानंतर माध्यमांनी त्यांना शहरी नक्षलवादी टोळ्यांबद्दल विचारले असता, ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारच्या पाठिंब्याने, राज्यात विकासाचे काम वेगाने सुरू आहे. तथापि, असे काही लोक आहेत जे या विकासाला विरोध करत आहेत आणि अनावश्यकपणे या कामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री धामी यांनी शहरी नक्षलवादी टोळ्यांवरील विधानामुळे उत्तराखंडच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.





