पुणे जिल्हा | जनावरांच्या खाद्यासाठी 3500 रुपये प्रतिटनाने ऊस खरेदी

बारामती – पावसावर शेती धंदा अवलंबुन असल्याने दुग्धव्यावसायावर अर्थकारण प्रामुख्याने अवलंबुन आहे. जनावरांसाठी आवश्यक चारा केव्हाच संपुष्टात आला आहे. सध्या शेतकरी मिळेल तेथुन ऊस आणुन पशुधन जगवित आहेत. 3500 रुपये प्रतिटन दराने शेतकरी ऊस आणत आहेत. काही ठीकाणी जागेवर ऊस पोहच केला जात आहे. पावसावर जनावरांच्या चा-याची उपलब्धता अवलंबुन आहे.
समाधानकारक पाऊस झाल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी चारा उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे जून-जुलैमध्ये पावसाची शक्यता गृहित धरल्यास चारा उपलब्धतेसाठी दिवाळी उजाडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शेतक-यांना पशुधन विकतचे खाद्य आणुन जगवावे लागणार आहे.
पशुखाद्य, चा-याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच दुधाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे जनावरे जगविण्यासाठीच शेतक-यांना विकतचा चारा घेवुन धडपड करावी लागत आहे. दुधाला मिळणारे अनुदान हा काही प्रमाणात मिळणार दिलासा वगळता शेतक-यांचे दूध धंद्यावरील अर्थकारण सध्या अडचणीत आल्याचे चित्र आहे.
मिळेल तेथुन पाणी आणुन जनावरांची तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जिरायती भागात पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा असणारी चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावर प्रशसानाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.





