Purandar | गणेशोत्सवाची तयारी जोरात; मूर्ती सजावट, देखाव्यांचे नियोजन आणि मंडळांची बैठका सुरु

प्रभात वृत्तसेवा
दिवे – राज्यातील आणि देश, विदेशातील गणेशभक्तांच्या लाडक्या बाप्पांचे येत्या काही दिवसांतच आगमन होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष गणरायाच्या आगमनाकडे लागले आहे. एकूणच बापांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. गणेश उत्सवाची वर्षानुवर्षे परंपरा जपणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची लगभग सुरु आहे. सजावट साहित्याची जुळवाजुळव, गणेश मूर्तींना रंगकाम, सजावट करण्यात पुरंदर तालुक्यातील मंडळे व्यस्त आहेत.
बुधवार (दि.२७) ऑगस्ट रोजी लाडक्या गणपती बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात होत असून ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे. त्यामुळे आता उत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. एक महिन्यापेक्षा कमी दिवस शिल्लक असल्याने तेवढ्या दिवसांत नियोजन करण्याचे गणेश मंडळांपुढे मोठे आव्हान असते. त्यामुळे गणेश मूर्तींची स्थापना करण्यापूर्वी देखावा कोणता उभारायचा, गणपती मूर्तीसमोर सजावट कशा पद्धतीने करायची, मूर्ती कोणत्या पद्धतीची घ्यायची, यंदा विशेष काय उपक्रम राबवायचा याबाबत मंडळातील कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत.
यंदा १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्णाष्टमी असल्याने दहीहंडी उत्सव मंडळांची त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. त्याचबरोबर २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरु होत असल्याने दोन्ही उत्सवांचे नियोजन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान उत्सवाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात सर्वांचीच खूप गडबड सुरु असते. त्यामुळे उत्सवमूर्तींना रंगकाम करणे, मूर्तींची सजावट करणे यासाठी मंडळांची लगभग सुरु झाली आहे. यासाठी विविध ठिकाणाहून मूर्तींना रंगकाम करणारे कलाकार शोधून त्यांच्याकडून रंगकाम करून घेणे अशा प्रकारची कामे ठिकठिकाणी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.




