Purandar International Airport : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुणे व पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय असल्याचे सांगत पुण्याचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मोहोळ म्हणाले, “वाढती एअर कनेक्टिव्हिटी ही उद्योग, व्यवसाय, आयटी क्षेत्र, पर्यटन तसेच कृषी निर्यातीसाठी निर्णायक ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पुरंदर विमानतळ हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा पर्याय उपलब्ध होणार असून, वाढत्या प्रवासी व मालवाहतूक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मध्य पूर्व, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया आदी महत्त्वाच्या जागतिक मार्गांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होण्यास मदत होईल, ज्यामुळे निर्यात, परकीय गुंतवणूक आणि जागतिक व्यवसाय संधींना नवी दालने खुली होतील.” पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि गुंतवणूक वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला. राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून पुरंदर विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.