Panjab Police : पंजाब पोलिसांची मोठी कारवाई ! 2 गुप्तहेरांना केली अटक

अमृतसर : पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अमृतसरमध्ये एका मोठ्या हेरगिरी घोटाळ्याचा पर्दाफाश करून दोन हेरांना अटक करण्यात आली आहे. आरोपी सैन्याची गोपनीय माहिती लीक करत होते. या दोघांचेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी असलेले संबंध उघड झाले आहेत. आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावे पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी आहेत. आरोपींनी लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो शत्रूला पाठवले. तुरुंगात असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅपीचे संबंध आहेत. दोघांविरुद्ध अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका मोठ्या कारवाईत, पंजाब पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित एका हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी अमृतसर येथून पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोन संशयितांना अटक केली आहे. तपासात असे दिसून आले आहे की, दोन्ही आरोपींनी भारतीय लष्करी छावण्या, हवाई तळ आणि इतर मोक्याच्या ठिकाणांचे फोटो आणि माहिती शत्रू देशाला दिली. तुरुंगात बंद असलेल्या गुंड हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅपीच्या नेटवर्कद्वारे ही सर्व माहिती आयएसआयला पाठवली जात होती.
पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक केलेले आरोपी एका संघटित हेरगिरी टोळीशी संबंधित आहेत. हे लोक सोशल मीडिया आणि बनावट कागदपत्रांद्वारे लष्करी तळांवर प्रवेश करून संवेदनशील माहिती गोळा करत होती. या संपूर्ण प्रकरणात अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ मे २०२५ रोजी अमृतसर ग्रामीण पोलिसांनी एका महत्त्वपूर्ण हेरगिरीविरोधी कारवाईत, पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोन व्यक्तींना अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्रे आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे लीक करण्याच्या कथित भूमिकेसाठी अटक केली.
पोलिस महासंचालक (डीजीपी) यांनी सोशल मीडियाद्वारे या कारवाईची पुष्टी केली आणि सांगितले की, पंजाब पोलिस कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना सोडणार नाहीत. ही एक निर्णायक कारवाई आहे आणि तपास सुरू आहे. येत्या काळात आणखी मोठे खुलासे होऊ शकतात. या खुलाशामुळे राज्यभरातील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढली आहे आणि गुप्तचर विभागाकडून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंजाब पोलिसांचे हे यश देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.





