Punjab Blast : पंजाब लष्करी छावणीबाहेर दुहेरी स्फोट ; स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण
Punjab Blast : पंजाबमध्ये रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Punjab Blast : पंजाबमध्ये रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सुरुवातीला जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मुख्यालयाबाहेर स्फोट झाला. त्याच्या काही तासांनंतर, अमृतसरच्या खासा भागातील लष्करी छावणीजवळ स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिली घटना जालंधरमध्ये रात्री सुमारे ८:१५ वाजता घडली, जिथे बीएसएफ पंजाब मुख्यालयाबाहेर पार्क केलेल्या स्कूटरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची पुष्टी झालेली नाही.
काही तासांनंतर अमृतसरमध्ये स्फोट Punjab Blast :
जालंधर घटनेच्या अवघ्या काही तासांनंतर, रात्री सुमारे १०:३० वाजता, अमृतसरच्या खासा भागातील लष्करी छावणीजवळ स्फोट झाला. स्थानिकांच्या मते, स्फोटाचा आवाज दीड किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. इतकेच नाही, तर स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे छावणीच्या परिसराच्या भिंतीही हादरल्या.
सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल
दोन्ही घटनांनंतर लष्कर आणि पंजाब पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. फॉरेन्सिक पथकांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले असून ते पुरावे गोळा करत आहेत. आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला असून तपास सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही घटनांमध्ये कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याची पुष्टी झालेली नाही. तथापि, स्फोटांचे स्वरूप आणि कारण निश्चित करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
जालंधर पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी, “आमचे गस्ती पथक रात्री ८ वाजण्याच्या सुमारास येथे उपस्थित होते. गेटजवळ एक स्कूटर उभी होती. अचानक तिला आग लागली. आम्ही बीएसएफकडून माहिती गोळा करत आहोत. प्राथमिक माहितीनुसार, ही स्कूटर येथे काम करणाऱ्या एका व्यक्तीची असून तो येथे आल्यावर तिला आग लागली. आम्हाला या घटनेच्या प्रत्येक पैलूचा तपास करायचा आहे.” आधी माहिती दिली.
तपासात गुंतलेल्या यंत्रणा Punjab Blast :
दोन्ही स्फोटांमध्ये काही संबंध आहे की या वेगवेगळ्या घटना आहेत, हे सुरक्षा यंत्रणा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरात दक्षता वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या घटनांनंतर, संपूर्ण पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही संभाव्य धोका वेळेत रोखता येईल.






