पुणेकरांचे मत’दान’ कोणाच्या पारड्यात?

कोण कोणत्या मतदार संघातून विजयी होणार यांचीच सर्वत्र चर्चा

पुणे – लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अवघे दोन दिवसच राहीले असून कोण कोणत्या मतदार संघातून विजयी होणार यांचीच चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. मतदान प्रक्रियेनंतर तब्बल महिनाभराने निकाल जाहीर होत असल्याने सगळ्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून 31 उमेदवार रिंगणात असले तरी, खरी लढत भाजपचे गिरीश बापट आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी यांच्यात आहे. सुरवातीपासून या मतदार संघात भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र बदलण्यात जोशी यांना काही प्रमाणात यश आले आहे. शेवटच्या टप्प्यात जोशी यांनी केलेला आक्रमक प्रचार निवडणुकीचे पारडे बदलू शकणारे ठरू शकते.

पुणे लोकसभा मतदार संघाचा इतिहास पाहता हा मतदार संघ पारंपरिकदृष्ट्या कॉंग्रेसचा आहे. परंतु, सुरेश कलमाडीनंतर या मतदार संघात भाजपने आपली पकड प्रस्तापित केली आहे. गेल्या वेळी अनिल शिरोळे हे विक्रमी मतांनी विजयी झाले होते. त्यानंतरच्या पाच वर्षांत सगळीच समीकरणे बदलली. केंद्रात भाजपचे सरकार आले. राज्यातही त्यांचेच सरकार आले आणि गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पालिका भाजपकडे एक हाती गेली.त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसपेक्षा भाजपचे पारडे जडच होते. त्यातच शिवसेना आणि “आरपीआय’ची युती झाल्याने त्यांचा फायदा सुद्धा भाजपला झाला. शहरात भाजपची सत्ता तर आहेच भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा शहराशी असणारा परिचय सुद्धा महत्त्वाचा आहे.गेली चाळीस वर्षे ते पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. अगदी नगरसेवकापासून त्यांनी राजकारणाला सुरवात केली. त्यामुळे पुण्यात गिरीश बापट यांना सगळेच ओळखतात. त्याच्या पक्षात नाही तर विरोध पक्षात सुद्धा त्यांचे मित्र आहेत. त्याचाही त्यांना फायदा होईल, असे चित्र आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी हे अगदी निष्ठावान म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यंदा पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास टाकत त्यांना रिंगणात उतरविले. प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी ही पक्षाने ऐनवेळी जाहीर केल्याने थोडी अडचण झाली. कारण, प्रचारासाठी तेवढा वेळ मिळाला नाही. तरी सुद्धा मोहन जोशी यांनी शेवटच्या टप्प्यात केलेल्या प्रभावी प्रचारामुळे निवडणुकीत रंगत आली.कॉंग्रेसची प्रचार यात्रा एकट्या मोहन जोशी यांनीच लढविली. कारण, कॉंग्रेसचा कोणताच केंद्रीय नेता यावेळी पुण्याच्या प्रचारात सहभागी झाला नव्हता. अगदी प्रचाराच्या अखरेच्या दिवशी सुद्धा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत समारोप झाला. तेवढीच एक जमेची बाजू म्हणता येईल. प्रचाराचे दहा ते पंधरा दिवस मोहन जोशी आणि शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर पिंजून काढले. त्यामुळे मोहन जोशी निवडणूक आले तर हा विजय खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा असणार आहे. त्या उलट भाजपने अनेक राष्ट्रीय नेते पुण्यात प्रचाराला आले होते. त्यात नितीन गडकरी यांनी दोन सभा घेतल्या. मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा झाली. याशिवाय पियुष गोयल हे सुद्धा प्रचारात येऊन गेले.

कोण किती मते खाणार…
पुणे लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्या म्हणजे 23 एप्रिलला मतदान झाले. मतदानाच्या दिवशी शहराच्या मध्यवस्ती तसेच कोथरुड, शिवाजीनगर या भागांत चांगले मतदान झाले. हा पट्टा पारंपरिक भाजपचा मानला जातो. त्यामुळे या भागातून बापट यांना चांगले मतदान झाले असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि वडगावशेरीमध्ये देखील 50 टक्‍क्‍याहून जास्त मते ही भाजपला गेल्याचे बोलले जाते. कॉंग्रेस व भाजप व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव आणि हमारी अपनी पार्टीचे राजेश अग्रवाल हे दखील रिंगणात होते. हे उमेदवार किती मते खाणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. मतदानाच्या दिवशी झालेले कमी मतदान हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे मतदान कमी झाले. कमी मतदानाचा तोटा कोणाला होणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.

गुरुवारी होणार चित्र स्पष्ट
येत्या गुरुवारी पुणे लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट होईल. दुपारी 1 नंतर साधारण अंदाज जाहीर होईल, असे समजते. संपूर्ण निकाल जाहीर व्हायला सायंकाळी 4 ते 5 वाजतील, अशी शक्‍यता आहे. एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार पुण्यात भाजपचा उमेदवार विजयी होईल, असे जरी सांगत असले तरी मोहन जोशी हे “डार्क हॉर्स’ ठरू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.