पुणे | पुणेकरांचे झेब्रा दर्शन लांबणार ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पुणे महापालिकेच्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात महापालिकेकडून पर्यटकांसाठी झेब्रा आणला जाणार आहे.
त्यासाठीच्या खंदकाचे काम पूर्ण झालेले असताना; आता महापालिकेने पुण्यात झेब्रा आणावा की नाही याबाबत तज़्ज्ञ समितीशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश उद्यान विभागास दिले आहेत.
या झेब्रा खरेदीसाठीचा प्रस्ताव उद्यान विभागाकडून आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यावेळी आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
त्यामुळे समितीच्या अहवालावर झेब्रा आणायचा की नाही हे ठरणार असल्याने पुणेकरांचे झेब्रा दर्शन लांबणीवर पडणार आहे. या झेब्रासाठी महापालिकेने तब्बल दिड कोटी रूपये खर्चून पाच हजार चौरस मीटरमध्ये खंदक तयार केले आहे.
पुण्यातील वातावरण झेब्रांसाठी पोषक आहे. भारतात सध्या म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद, केवडीया येथील प्राणी संग्रहालयामध्ये झेब्रा आहेत. तर, महाराष्ट्रातील एकाही प्राणी संग्रहालयात झेब्रा नसल्याने पुण्यातील प्राणी संग्रहालयात पर्यटकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.
सुरूवातीला तो अफ्रिकेतून आणण्याचे नियोजन होते. भारतामध्ये झेब्राचे प्रचंड आकर्षण असल्याने त्याची मागणी होते. झेब्रा आणण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेसाठी एक ठेकेदार पुढे आला होता.
मात्र, त्यांच्याकडून आंतराष्ट्रीय निकष पूर्ण होत नसल्याने आता पुन्हा नव्याने झेब्रा आणण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. त्यानुसार युरोप आणि इस्राइलमधून झेब्रा आणण्याची तयारी सुरू केली प्राणी संग्रहालयात दोन मादी आणि दोन नर, अशा चार झेब्रांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचे वय साधारणपणे ३ ते ४ वर्ष इतके असणार आहे.





