Pune : थंडीच्या कडाक्याने गारठले पुणेकर

पुणे : शहरात हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा पारा दिवसेंदिवस घटत असून, आजही शहरात एनडीए परिसरात सर्वांत कमी ६.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर शिवाजीनगर परिसरात थंडीचा पारा ८ अंशांवर होता. दरम्यान, पुढील २४ तास थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
मागील आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यात हुडहुडी भरणारी थंडी पडली असून, १२ ते १३ अंशांवर असलेले किमान तापमान तीन ते चार दिवसांत तब्बल ६ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत. महाबळेश्वरपेक्षा पुणे शहरातील किमान तापमान निम्म्याने घटले आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शहराच्या पश्चिम भागातील एनडीए, पाषाण, कोथरूड, वारजे, धायरी, कात्रज, औंध यांसह अन्य भागात थंडीचा जोर अधिक आहे.
मागील चार दिवसांपासून एनडीए, हवेली, माळीण आणि शिवाजीनगर भागांतील थंडीचा पारा ६ ते ७ दरम्यान आहे. यंदाच्या हंगामातील हे नीचांकी तापमान असून, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानंतर किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे थंडीचा कडाकाही कमी होईल, असे वेधशाळेने सांगितले. दि. २० डिसेंबरनंतर शहरात आकाश निरभ्र, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
एनडीए – ६.५, हवेली – ६.९, शिरूर – ७.४, माळीण – ७.७, बारामती – ७.८, शिवाजीनगर – ८, पाषाण आणि दौंड – ८.३, तळेगाव – ८.७, नारायणगाव – ८.८, आंबेगाव – ९.६, ढमढेरे – ९.९, इंदापूर – १०.१, राजगुरूनगर – १०.३, लवासा – १०.५, पुरंदर – १०.७, निमगिरी – १०.८, भोर – १२.३, कोरेगाव पार्क – १३





