पुणेकरांनो, अखेरच्या दिवशी तरी गणेशमूर्तीचे पावित्र्य जपा

मूर्ती दान करणाऱ्याला 2 किलो खत मोफत देणार; महापालिका आणि “भूमी ग्रीन’ यांचा उपक्रम
पुणे – दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जे नागरिक मूर्ती दान करतील त्यांना महापालिकेच्या कंपोस्ट प्रकल्पातून निर्माण झालेले दोन किलो खत देण्यात येणार आहे. महापालिका आणि भूमीग्रीन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
सर्व विसर्जन घाट, हौद, टाक्या या ठिकाणी मूर्ती दान करता येणार आहेत. दि.10 सप्टेंबर रोजी या उपक्रमाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सुरुवात करण्यात येणार आहे.
पावसामुळे विसर्जनाचे घाट पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठी जाणे धोक्याचे होणार आहे. त्यामुळे नदीत मूर्ती विसर्जनाला जाण्यापेक्षा महापालिकेने बांधलेल्या हौदात ते विसर्जन करावेत. अथवा मूर्ती दान करावी, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी केले आहे.
मूर्ती दान करा किंवा हौदांत विसर्जित करा
नदीकाठ पूर्णपणे पाण्याने व्यापला आहे. दीड, तीन, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन अनेकांनी नदीमध्ये केले आहे. मात्र, पाणी ओसरल्यानंतर त्या मूर्ती पाण्यात अद्याप न विरघळल्याने नदीकडेला आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी सोमवारी दिवसभर या मूर्ती गोळा करून एके ठिकाणी ठेवण्याचे काम केले आहे. विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी असे प्रकार होऊ नयेत यासाठीच नागरिकांनी मूर्ती विसर्जन हौदात विसर्जित करावी अथवा ती दान करावी, असे महापालिकेचे आवाहन आहे.





