घरी बसूनच पक्षी निरीक्षणाची पुणेकरांना पर्वणी

21 दिवसांच्या लॉकडाउन काळात पक्ष्यांच्या हालचाली, आवाज टिपून “ई-बर्ड’वर नोंदवा
पुणे – लॉकडाउन काळात काय करायचे? असा प्रश्न अनेकांना सतावत असेल. या प्रश्नावर पर्यावरण प्रेमींकडून आणखी एक चांगला पर्याय सुचवण्यात आला आहे, तो म्हणजे घरी बसून पक्षी निरीक्षण करण्याचा. आपल्या सभोवताली असलेले पक्षी, त्यांच्या हालचाली, त्यांचे आवाज हे सर्व टिपून, “ई-बर्ड’ या पक्षी निरीक्षण ऍप अथवा संकेतस्थळाच्या सहाय्याने तुम्ही शहरातील जैवविविधतेच्या नोंदी टिपण्यात महत्त्वाचा हातभार लावू शकता.
लॉकडाउनमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने, निसर्गाचे अनोखे रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. शहरी भागांतही गेली अनेक वर्षे ज्या पक्षांचे दर्शन होत नव्हते, ते पक्षी पुन्हा एकदा किलबिल करू लागले आहेत. अशावेळी पक्ष्यांच्या नोंदी घेणे महत्त्वाचे ठरू शकते. मात्र, लॉकडाउनमुळे अनेक अभ्यासकांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने या माध्यमातून पक्ष्याच्या नोंदी घेण्याचा प्रयत्न अभ्यासकांकडून केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत आवाहनही केले जात आहे.
या माध्यमातून पक्षणबद्दल माहिती मिळण्याबरोबरच नागरिकांमध्येही पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण होईल. त्यातून निसर्गाशी नाते जुळून निसर्गसवर्धनासाठी मोलाचा हातभार लागेल, अशी अपेक्षाही अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
असे करा पक्षी निरीक्षण
दिवसातून चार वेळा (खाली दिल्याप्रमाणे) घराच्या खिडकी, गॅलरी अथवा टेरेसवर जाऊन काही काळ आपल्या सभोवताली असलेल्या पक्ष्यांच्या विविध हालचाली कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपायच्या. त्यानंतर ई-बर्ड या ऍपवर त्या पक्ष्यांबाबत तुम्ही टिपलेली माहिती नोंदवायची. यामध्ये पक्ष्याचे नाव, फोटो, ठराविक वैशिष्ट्ये, पक्ष्यांच्या थव्याच्या उडण्याचा मार्ग (फ्लायवे) अशी विविध माहिती नोंदवता येईल. याबाबत सविस्तर माहिती ऍपवर उपलब्ध आहे.





