साथीच्या आजारांनी पुणेकर त्रस्त

सर्दी, ताप, खोकल्यासारख्या आजाराने शहर बेजार
विचित्र वातावरणाचा आरोग्यावर परिणाम
पुणे – सततचे बदलते हवामान, ढगाळ वातावरण, धूळ, धूर आणि धुके या विचित्र वातावरणामुळे डिसेंबर महिना “आजारा’चा ठरलेला आहे. स्वाइन फ्लूचा धोका वाढलेला नसला तरीही सर्दी, ताप, खोकला, घसा यासारख्या साथीच्या आजाराने शहर बेजार झाले आहे. त्यातच डेंग्यू, चिकनगुणिया, टायफाईड, मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे 30 टक्के रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे शहर थंडीने कुडकुडण्यापेक्षा आजाराने हैराण झाले आहे.
यंदा पावसाने दिवाळीनंतरही राज्यात ठाण मांडले होते. त्यामुळे रोगराई पसरली होती. साथीच्या आजारांसह डेंग्यू आणि चिकनगुणिया या आजारांनी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात थैमान घातले होते. या काळात डेंग्यूचे जवळपास दीड हजार पॉझिटिव्ह तर, सहा हजार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे नोव्हेंबरच्या मध्यानंतर डेंग्यूचा ज्वर कमी होत नाही तोच विचित्र हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण वाढू लागले.
तीच परिस्थिती सध्या कायम आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात तर वातावरणात सारख्या होणाऱ्या बदलामुळे आणि कमी-जास्त तापमानामुळे विषाणूजन्य आजारांची तीव्रता दुप्पट झाली. तसेच, हवेच्या प्रदूषणामुळे तर, रोगराईने कळसच गाठला.
त्यामुळे या महिन्यात सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या लक्षणांनी डोके वर काढले. इतकेच नव्हे तर नवनवीन विषाणूजन्य आजारांमुळे डेंग्यू नसतानाही प्लेटलेट कमी होत असल्याचेही तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. या महिन्यात खोकल्यामुळे अनेकांना त्रास झाला.
काही जणांचा खोकला तर 15-15 दिवस औषधे घेऊनही बरा होत नसल्याचे दिसून आले. महापालिकेचे तसेच मेडिकलमधील औषधे घेऊनही बरे वाटत नसल्याने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत या रोगराईने थैमान मांडले होते. त्यामुळे नागरिक ऍलोपॅथीऐवजी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीकडेही वळताना दिसून आले.
मागील 15 दिवसांपासून शहरातील हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला आणि त्वचेची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. या वातावरणाचा लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना अधिक त्रास होतो. तसेच संधिवात आणि अस्थमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. नेहमीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के रुग्ण अधिक आढळून येत आहेत. दरम्यानच्या काळात डेंग्यूचे रुग्ण कमी झाले आहे.
– डॉ. नितीन जंगम, फॅमिली फिजीशीयन





