पुणेकर येथे सांडपाण्यात राहतात!

लोहियानगर परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ
– ड्रेनेज दुरस्ती टाळून एसआरएच्या नावे बोळवण
पुणे – देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत स्थान मिळवणार्या आणि देशातील दहाव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर असलेल्या पुण्यातील लोहिया नगरमधील जवळपास ४० ते ५० नागरिक रोज सांडपाण्यात राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहियानगर नाल्याजवळील प्रभाग क्रमांक १९ मधील सर्व्हे क्रमांक ५३/५४ मधील सहा गल्ल्यांमध्ये ड्रेनेज वाहिन्या तुंबत असल्याने ही स्थिती आहे.
महापालिकेकडे सातत्याने तक्रारी करूनही केवळ तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जात असून, आठवडाभराने पुन्हा घरामध्ये सांडपाणी शिरते. दररोज पहाटेपासूस सुरू होणारा हा त्रास दुपारी दोन वाजेपर्यंत कायम असतो. तर, अनेकदा या पाण्यात मैलाही वाहून येत असल्याने या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिसरात सहा गल्ल्या असून, काही घरे नाल्याकडेला आहेत. येथे पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिरते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आता ड्रेनेजही तुंबत आहे. तसेच त्याची झाकणे गल्लीतील रस्त्यांवर तसेच काही नागरिकांच्या घरामागील बाजूला आहेत.
त्यामुळे हे गटाराचे पाणी थेट बाथरूममध्ये उलटे येते. परिणामी, दररोज सकाळी कोणाच्या ना कोणाच्या घरात अथवा दारात नळाशेजारीच ड्रेनेजचे पाणी वाहत असते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक वारंवार करतात. प्रत्यक्षात किरकोळ निधी देऊन या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पुनर्वसनाचे कारण देत टाळाटाळ
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून रहिवाशांना घरे दिली जाणार आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे योजनेचे कामच सुरू झालेले नाही. त्यामुळे परिसरात मलनि:स्सारणाची कामे करता येत नाहीत, असा दावा केला जात आहे. महापालिकेच्याचा ड्रेनेज स्वच्छता विभाग तसेच परिमंडळ उपायुक्त कार्यालयाकडून ड्रेनेज लाइन बदलणे अथवा त्याची दुरूस्तीची कामे केली जात नाहीत. त्यासाठी निधीची मागणी नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी केली, तरी एसआरएचे कारण देत तुटपुंजा निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरते. नगरसेवक नसल्याने प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. या कामासाठी २ ते ३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असताना प्रत्यक्षात १० ते २० लाख रुपयांचा निधी दिला जातो. त्यातून तात्पुरती कामे केली जातात. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, महापालिकेने थोडी तरी संवेदनशिलता दाखविण्याची गरज आहे.
– अर्चना पाटील, माजी नगरसेविका





