वाढत्या तापमानामुळे पुणेकर हैराण
सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पारा ४२ अंशावर
पुणे – पुणे शहरासह जिल्ह्याच्या तापमानात वाढ सुरूच आहे. आज शहरात पार्याची उसळी कायम असल्याने तापमान जवळपास ४२ अंश सेल्सियस पर्यंत पोहचले आहे. अंगाची लाहीलाही करणार्या या उष्म्याचा लोकांना तडाखा बसत आहे. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून उन्हाच्या झळा जाणवत आहेत. हवेतील उष्मा कमालीचा वाढल्याने उकाडा असह्य होत असल्याचे नागरिकांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे पुणेकर उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी डोक्यावर टोपी, रूमाल घालत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता इतकी जाणवत आहे की, अनेक जण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. काल शहरात जवळपास ४२.६ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची दररोज नोंद होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर या उन्हाचा आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.





