अवकाळी पावसाने पुणेकर कूल! विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा… झाडपडीच्या 11 घटना, एक जखमी

पुणे – आज गुरुवारी (3 एप्रिल 2025) सायंकाळी पुणे शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांच्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आणि गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसाने काहींची धावपळ झाली, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं कोसळली.
झाडपडीच्या घटनांमध्ये औंध, बावधन, हडपसर, मार्केटयार्ड, वारजे, बाणेर आणि कुमठेकर रोड परिसरांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावर आणि चारचाकी वाहनांवर कोसळली, तर बालेवाडीत लोखंडी शेड पडून एक जण जखमी झाला.
हडपसरमध्ये रामटेकडी, मगरपट्टा चौक आणि हुंदाई शोरूमजवळ झाडं पडल्याने वाहतूक ठप्प झाली. बाणेरच्या आंबेडकर नगरात आणि कुमठेकर रोडवर चारचाकी वाहनांवर झाडं कोसळली, तर बावधनमध्ये इलेक्ट्रिक डीपीवर झाड पडल्याने धोका निर्माण झाला. वारजे अग्निशमन केंद्रासमोरील चर्चजवळ आणि औंधच्या मेडिपॉईंट हॉस्पिटल रस्त्यावरही झाडपडीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत रस्ते मोकळे केले.
बालेवाडी येथील मॅजेस्टिक सिग्नेचर टॉवर येथे पावसामुळे पत्र्याचे छत कोसळले यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले.
या पावसामुळे शहरात गोंधळ उडाला. गारांचा मारा आणि वादळी वाऱ्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बालेवाडीतील जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं. अग्निशमन दलाने या घटनांवर त्वरित प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली. हवामान खात्याने पुढील काही तास पाऊस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनांमुळे पुणेकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून, झाडांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
पावसाने आणला गारवा-
पावसाने थंड वातावरण निर्माण करत उकाड्यापासून दिलासा दिला. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने शहरातील गर्मी दूर केली. काही ठिकाणी गारा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला, तरीही अनेक पुणेकरांनी या पावसाचा आनंद लुटला. रस्त्यावर तरुण-तरुणी भिजताना दिसले. “उन्हाळ्यात असा पाऊस म्हणजे निसर्गाची देणगी,” असं एका नागरिकाने सांगितलं. या पावसाने वातावरणात गारवा तर आलाच, पण नागरिकांमध्येही उत्साह संचारला.









