पुणे | ढोल-ताशा पथकांच्या मदतीला धावले पुनीत बालन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात आलेल्या पुरात नदीकाठच्या अनेक ढोल-ताशा पथकांचे साहित्य वाहून गेले. या सर्व ढोल-ताशा पथकांच्या मदतीला युवा उद्योजक पुनीत बालन हे धावून आले असून, ढोल-ताशा पथकांचे झालेल्या नुकसानीबद्द्दल त्यांना साहित्याची मदत करण्याचे जाहीर केले आहे.
सांस्कृतिक पुण्यात ढोल-ताशा पथकांना एक वेगळेच महत्त्व आहे. गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांचे वादन ऐकण्यासाठी देशभरातील गणेशभक्त आसुसलेले असतात आणि त्याची प्रचिती आपणा सर्वांनाच दरवर्षी येते. ही पथके प्रामुख्याने नदीकाठी सराव करतात. याच भागात ढोल-ताशा, मंडप, इलेक्ट्रॉनिक्स मशीन इत्यादी साहित्य ठेवण्यात येते.
दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या पुरामध्ये यातील बहुतांश पथकांचे साहित्य वाहून गेले आहे. हे मोठे नुकसान कसे भरुन काढावे, या चिंतेत ढोल-ताशा पथकाचे कार्यकर्ते असतानाच त्यांच्या मदतीला युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख बालन हे धावून आले आहेत.
बालन यांनी रविवारी श्री ओंकारेश्वर मंदिराजवळ या ढोल-ताशा पथकांची आणि गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच गणपती बाप्पाचा भक्त म्हणून या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी चिंतेत असलेल्या ढोल-ताशा पथकांना आश्वस्त केले.
यावेळी ढोल-ताशा महासंघाचे संजय सातपुते, नितीन पंडीत, यज्ञेश मंडलिक, शिरिश थिटे, अनुप साठे शिगवान, तेजस पाठक, कमलेश कंठे, विशाल भेलके, मंडलिक, अभिजित कुमावत, मनिष पाडेकर, विशाल घरत, प्रकाश राऊत, अमर भालेराव, अनिश पाडेकर, अविनाश बकाल, विनोद आढाव, मंगेश साळुंखे यांच्यासह ढोलताशा महासंघाचे इतर पदाधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ढोल-ताशा पथक ही गणेशोत्सवातील प्रमुख ओळख आहेच; शिवाय पुण्याचे सांस्कृतिक वैभव आहे. नैसर्गिक आपत्तीत त्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे एक गणेशभक्त म्हणून मी माझे कर्तव्य समजतो. याच भावनेतून ढोल-ताशा पथकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून योगदान देता आले, याचे समाधान आहे. – पुनीत बालन, युवा उद्योजक




