Pune : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प उद्या (दि. १९) सादर केला जाणार आहे. प्रशासक राजवटीतील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे गेली अनेक वर्ष राज्याच्या अर्थमंत्र्यांचे उपसचिव राहिलेले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचा गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा सुमारे ४३४ कोटी रुपयांचा होता. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आणि योजना असतील याची जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता आहे. हा अर्थसंकल्प प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे दुपारी १२ वाजता सादर करणार आहेत.
महापालिकेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील २३ गावांचा झालेला समावेश, पाठोपाठ पुणे महानगर विकास प्राधिकरण, म्हणजेच पीएमआरडीएने मुद्रांक शुल्क निधीमध्ये हिस्सा घेतल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मूळ अर्थसंकल्प किती कोटी रुपयांचा असणार आहे, हेच आता पाहावे लागणार आहे.




