Pune : विधानसभा आणि संसदेत युवकांना मिळेल बोलण्याची संधी

पुणे : भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने विकसित केलेल्या भारत युवा संसद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १८ ते २५ वयोगटातील तरुण ९ मार्चपर्यंत माय भारत पोर्टलवर अर्ज करू शकतात, अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी दिली.
हा कार्यक्रम राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला जाणार आहे. सहभागींना १ मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल. तुमच्या मते विकसित भारत म्हणजे काय? या विषयावर १५० सर्वोत्तम व्हिडिओ निवडले जातील.
यानंतर निवडक १५० सहभागींना एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर त्यांचे विचार मांडण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड येथे आमंत्रित केले जाईल. यातील सहभागींपैकी १० विजेत्यांची निवड राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी केली जाईल आणि तीन विजेत्यांची निवड राष्ट्रीय स्तरीय कार्यक्रमासाठी केली जाईल.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संसदेत तसेच, राज्यातील विधानसभेत त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला विकसनशील भारत राष्ट्रीय युवा संसद २०२५ आयोजित करण्यासाठी बहुमान मिळाला आहे, असेही ते म्हणाले.





