पुणे – पुणे रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगार आणि गर्दुल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. लूटमारीबरोबरच नागरिकांवर सशस्त्र हल्ला होण्याच्या घटनाही वाढत आहेत. अशाच एका घटनेत एक फिरस्त्याच्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे.
पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून फिरस्त्याने तरूणावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना ४ जानेवारीला रात्री पावणेअकराच्या सुमारास तुकाराम शिंदे वाहन तळावर घडली आहे.
याप्रकरणी वडिथा गोविंदा नाईक ( २८, रा. बिबवेवाडी ) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून फिरस्त्या हल्लाखोराचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. जखमी मजुरी काम करतो तर फिरस्ता मिळेल ते काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नाईक हे ४ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील वाहनतळावरून पायी चालले होते. त्यावेळी एका फिरस्त्या गर्दुल्याने त्यांना गाठले. मला पैसे दे अशी मागणी त्याने नाईक यांच्याकडे केली.
मात्र, त्यांनी पैस देण्यास नकार दिला, त्याचा राग आल्यामुळे फिरस्त्याने तरूणाच्या खिशात हात घालून ८०० रूपये घेतले. त्याला विरोध केला असता, हल्लेखोराने खिशातील ब्लेड काढून नाईक यांच्या तोंडावर मारून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तपास करीत आहेत.
बंडगार्डन पोलिसांचे दुर्लक्ष
बंडगार्डन परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. रेल्वे आणि बस स्थानकात दररोज हजारो प्रवासी ये जा करत असतात. प्रवाशांना लूटणे, दमदाटी करणे, चोऱ्या करणे इतकेच नव्हे तर काही रिक्षा चालकांकडूनही प्रवाशांची अडवणूक केली जाते.
शहरात प्रवेश करताच प्रवाशांना अशा भयान अनुभवाला सामोरे जावे लागते. मात्र बंडगार्डन पोलिसांचे प्राधान्य रस्त्यावरील वाटमारी रोखण्याकडे दिसत नाही. बंडगार्डन पोलीस ठाण्यातून बदली झालेले काही कर्मचारी अजूनही तेथील अवैध्य धंदेवाल्यांशी संधान बांधून आहेत