पुणे : वर्चस्व वादातून तरुणाचा खून ; पाठलाग करत केला हल्ला

पुणे : परिसरातील वर्चस्व वादातून टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला टार्गेट करुन त्याच्यावर खूनी हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र तो मुलगा टोळक्याच्या तावडीतून सुटल्याने हाती लागलेल्या त्याच्या मित्राचा टोळक्याने खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री एक वाजता डहाणूकर कॉलनी येथे घडली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील काही आरोपींना गुन्हे शाखा आणि अलंकार पोलिसांनी अटक केली.
श्रीनु शंकर विसलवात (२२, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी ) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर आरोपींनी कोयत्याने मानेवर आणि पाठीवर पाच ते सहा वार केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी १७ वर्षे ११ महिण्याचा मुलगा आहे. तर मृत हा त्याचा मित्र आहे. ते दोघेही इतर मित्रांसोबत रात्री गप्पा मारत रस्त्यावर उभे होते. यावेळी आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने दुचाकीवरुन येऊन त्यांच्या मोपेडला धडक देऊन त्यांना खाली पाडले. यानंतर फिर्यादीवर कोयत्याने वार केला. त्याने तो चुकविला. मात्र कोयत्याच्या दुसरा उलटा वार त्याच्या हातावर लागला.
यानंतर फिर्यादीने तेथून घरी पळ काढला. मात्र श्रीनु हा टोळक्याच्या तावडीत सापडला. टोळक्याने त्याचा पाठलाग करुन मानेवर, पाठीवर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एम.एम.चव्हाण करत आहेत.





