पुणे : “नोकरी द्या, नशा नाही’ अशा घोषणा देत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बेरोजगारी आणि तरुणाईच्या वाढत्या समस्या यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब या आंदोलनाला उपस्थित होते.
युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काँग्रेस भवन, पुणे येथून निघाला आणि डेक्कन परिसराच्या पुढे बालगंधर्व चौकात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
“देशातील तरुणांना नशेच्या विळख्यात ढकलून बेरोजगार ठेवण्याचे हे सरकारचे षडयंत्र आहे. आम्ही याला कडाडून विरोध करू. सरकारने जर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत, तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून अधिक तीव्र लढा उभारेल. हे सरकार केवळ जाहिराती आणि घोषणा करत आहे, प्रत्यक्षात युवकांसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. आम्ही मागे हटणार नाही, युवकांचा हक्क मिळवूनच राहू,’ असे चिब यांनी भाषणात सांगितले.
प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांचेही भाषण झाले. यावेळी प्रदेश प्रभारी अजय चिकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, एहसान खान, रोहित कुमार, मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, सौरभ आमराळे, उमेश पवार, कौस्तुभ नवले,अजित सिंग, वैष्णवी किराड, दीपाली ससाणे, प्रथमेश आबनावे, प्रविण बिरादार, श्रीनिवास नालमवार, तारीक बागवान, गणेश उबाळे आदी उपस्थित होते.