Pune : डंपरखाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे : महापालिकेच्या कचर्याच्या डंपरखाली सापडून एका महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. एकता भरत पटेल (२३, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) असे तरुणीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास कॉमर झोनकडे जाणार्या रस्त्यावर छत्रपती शाहू महाराज चौक परिसरात ही दुर्देवी घटना घडली.
याप्रकरणी, डंपरचालक त्रंबक शेरखाने (३८,रा. औंध ) याला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता ही मराठवाडा मित्रमंडळ लोहगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती.
मंगळवारी दुपारी ती मोपेड दुचाकीवरून कॉमर झोनकडे जाणार्या रस्त्याने निघाली होती. छत्रपती शाहू महाराज चौकासमोरील बाजूस डंपरचा आणि तिचा अपघात झाला.
त्या वेळी डंपरचे पाठीमागील चाक तिच्या डोक्यावरून गेले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता.





