Pune : मनातले सगळेच काही बोलायचे नसते

पुणे : काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. त्या मनात ठेवायच्या असतात. शेतकरी बळीराजा आहे. आम्हीही शेतकरी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अशा प्रकारची व्यक्तव्ये करू नयेत, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना दिला. मनात काही गोष्टी ठेवायच्या असतात, याची त्यांना अजून सवय नाही. त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत. मात्र, त्यांची वादग्रस्त विधाने महागात पडत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
रविवारी माध्यमांशी संवाद साधताना पवार यांच्यासमवेत कोकाटेही उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी पावसाच्या नुकसानीची पाहणी करताना कोकाटे म्हणाले होते की, कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार. ढेकळाचे पंचनामे करणार का, असा सवाल त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानाटा विरोधकांनी निषेध केला होता. यावर पवार यांनी अशी विधाने महागात पडत असल्याचे सांगत कोकाटेंना काही गोष्टी मनात ठेवायचा सल्ला दिला.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी, या प्रश्नावर पवार म्हणाले की, कृषी खात्याने खूप चांगले काम केले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरु केले आहेत. जसे-जसे प्रस्ताव येतील, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. अचानक पाऊस आल्याने सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. सर्व बाधितांना मदत केली जाईल.
राज्यातील महिलांवरील अत्याचाराची तक्रार आल्याशिवाय त्या आपल्याला कळणार नाही. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरमध्ये अशा घटना उघडकीस आल्या आहेत. या सर्व घटनांचा तपास पोलीस यंत्रणा करत असल्याचे ही पवार यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही घेतला आहे. ही योजना लागू करताना आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही. लगेचच विधानसभा निवडणुका लागल्या. त्यामुळे तपासणीसाठी वेळ मिळाला नाही. आता दिलेले पैसे तर परत घेता येणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सगळेच गेल्यावर पक्षांतर बंदी कशी ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमधील सात आमदार सोडून गेले. याबाबत पवार म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी नागालँडचे सगळे आमदार मला भेटले होते. त्यांची तिथे काम होत नव्हती. त्यामुळे ते अस्वस्थ होते. या आमदारांनी मला भेटून तक्रारी केल्या होत्या. सगळेच आमदार गेल्यावर पक्षांतर बंदी कशी होईल.





