पुणे येरवड्यातील मनपा शाळांत बाहेरील मुले आणि गैरसोयींचा उच्छाद

संदीप घोडके, येरवडा, दि. 28 –येरवडा प्रभाग 6 मधील तब्बल 6 शाळांतील असंख्य गैरसोयींचा सामना करत शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेबाहेरच्या मुलांचा त्रास सहन करण्याचीही क्षमता संपली आहे. मागील पाच वर्षांत नगरसेवकांनी कित्येक लाखांचा निधी या शाळांवर खर्च केल्याचे सांगितले जाते. पण, या शाळांत त्यातील कवडीचही कामे झालेली नाहीत. मनपाच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करुनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
प्रभाग 6 येथील अनुसयाबाई सावंत शाळा, लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनची इंग्रजी आणि मराठी शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन, क्रीडानिकेतन शाळा क्रमांक 127 ब आणि अन्य एका शाळेचा समावेश आहे.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत जवळपास 2 हजारांवर विद्यार्थी शिकतात. मात्र, शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच अस्वछतेला सुरुवात होते. तेथे चिखल तसेच तुटलेले मोठे 2 ड्रेनेज आहे. या सहा शाळांपैकी एकाचीही स्वच्छतागृह सुस्थितीत नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनाही नैसर्गिक विधीसाठी त्रास होतो. काहीवेळा शाळेबाहेर जावे लागते. विद्यार्थ्यांच्यादृष्टीने ते असुरक्षित असले, तरी आरोग्यावर परिणाम होत असल्याने नाईलाजाने शिक्षकांना त्यांना सोडावे लागते.
शाळा परिसरात कचऱ्याचे ढीग जमले असून, याबाबतीत 6 शाळांनी मिळून येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. पण, हे प्रयत्न अपयशी ठरले. शाळेत गेल्या आठ दिवसांत पाणीच आलेले नाही. शाळेतील वायरिंग दुरुस्त करावी, अशी मागणीही क्षेत्रीय कार्यालयाकडे करण्यात आली. मात्र, “हे आमचे काम नाही’ असे सांगून टाळाटाळ करण्यात आली. शाळांतील अग्निशमन सिलिंडरही कालबाह्य आहेत. पालिकेने अग्निशमनासाठी दोन टाक्याही उभारल्या. मात्र, त्याला पाइपलाइनच जोडली नाही.
भिंतीला भगदाड, अश्लील मजकूर
शाळांच्या आवारात बाह्य मुलांचा नेहमीच वावर असतो. ही मुले खोलीत सिगारेट, मद्यासह अन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. भिंतीला भगदाड पाडून हे युवक ये-जा करतात. भिंतीवरही अश्लील मजकूर लिहिण्यात आलेला आहे. येरवडा पोलिसांना तक्रारीही करूनही कोणी लक्षच देत नाही.
…तरीही दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा
या बहुतांश शाळांचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागलेला असून अनेक गुणवंत विद्यार्थी शाळेने घडविलेले आहे. पण, आता या शाळेला सुविधांची गरज असताना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अशा परिस्थितीमुळेच शाळांची पटसंख्या खाली येत आहे.




