Pune : येनपुरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक

पुणे : कात्रज, आंबेगाव भागात दहशत माजविणाऱ्या येनपुरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपुरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामती येथून अटक केली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) येनपुरे टोळीविरुद्ध कारवाई केली होती.
गेली दोन वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपुरे (वय ३०, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) याला अटक करण्यात आली. येनपुरे मोबाइल वापरत नव्हता, तसेच तो वास्तव्याचे ठिकाणही बदलायचा.
त्यामुळे तांत्रिक तपासात त्याच्याविषयी फारशी मिळत नव्हती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारावकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी त्याचा माग काढत होते. तपासात तो बारामतीतील नीरा वागस परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावत त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश माेकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन चोरमोले, सागर बोरगे, चेतन गोरे यांनी ही कारवाई केली.




