Pune : उपलब्ध आहे त्याच्या पलिकडे लिहा; तुमची प्रतिभा आणि प्रतिमा उंचावेल

पुणे : मोठ्या व्यक्ती, मोठे प्रसंग लेखकांना नेहमीच साद घालतात. वाचकांची दाद मिळविण्यासाठी उपलब्ध आहे त्या पलीकडे जाऊन लिहायचा प्रयत्न केला, तर तुमची प्रतिभा आणि प्रतिमा उठून दिसेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या होय, मी लेखक होणारच! कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात पाटील बोलत होते. न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, विश्वस्त राजेश पांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन समितीच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, सागर वैद्य, प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, चांगला लेखक होण्यासाठी प्रचंड वाचन, एकाग्रता, सातत्य, संशोधन, झोकून देण्याची वृत्ती, अथक प्रयत्न, धैर्य, कौशल्य, सतर्कता हे गुण आवश्यक आहेत. तसेच आजूबाजूला शहाणी माणसे हवीत. कान धरणारे प्राध्यापक, पत्रकार, वाचक असावेत. केवळ प्रशंसा करणारे मित्र नसावेत. मराठे म्हणाले, जे लेखन संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा विचार करते, ते साहित्य असे म्हटले जाते. साहित्य अक्षय असते. परंतु जे केवळ लिहिले जाते ते साहित्य नसून जे सातत्याने वाचले जाते ते खऱ्या अर्थाने साहित्य असते.
डॉ. काळकर म्हणाले, मनातील विचार शब्दांमध्ये व्यक्त करता आले पाहिजेत. या प्रक्रियेत शब्दांचा दर्जा, पोत, मांडणी महत्वाची असते. या प्रयत्नांची सातत्यपूर्ण पुनरावृत्ती केल्यास तुमच्यात हरवलेला लेखक मिळू शकेल. त्यासाठी खूप वाचन आणि अभ्यास आवश्यक आहे. निषिता पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले.
पंतप्रधान युवा योजनेत शिष्यवृत्ती
वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने युवा, होतकरू लेखकांसाठी पंतप्रधान युवा योजना सुरू केल्याची माहिती मराठे यांनी यावेळी दिली. वर्यामर्यादा ३० वर्षांखालील असतील. यात एका विषयावर किमान दहा हजार शब्दात १० एप्रिलपर्यंत लिखाण करुन पाठवयाचे आहे. यशस्वी निवडक ७५ विद्यार्थ्यांना पुढील सहा महिने प्रति महिना ५० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सविस्तर माहिती शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (एनबीटी) संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




