पुणे : आम्ही पुणेकर संस्थेच्यावतीने टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि भारतातील १३ राज्यांतून सुमारे आठ हजार कि.मी.चा प्रवास केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. यावेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव आदी उपस्थित होते. संपूर्ण जगासाठी एक स्वातंत्र्यदेवता म्हणून शिवाजी महाराज यांचे महत्त्व आहे. आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी हे युगपुरुष प्रेरणादायी आहेत. जगभरात त्यांचे स्मारक निर्माण झाले पाहिजे. सामर्थ्य हे दीनदुबळ्यांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी असले पाहिजे हे शिवरायांनी सांगितले. आज जगाला आदर्शवादाकडे नेणारे शिवराय आवश्यक आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर ते राष्ट्रपुरुष आहेत. छत्रपती महाराज झाले नसते तर ज्ञानोबा माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत संतांनी निर्माण केलेला सहिष्णू परंपरा असलेला समाज नष्ट झाला असता. वारकरी जगायचे असतील तर महाराजांसारखे धारकरी उभे रहावे लागतात. शांतता हवी, पण स्मशान शांतता नको. या दोन गोष्टीला फरक महाराजांनी दाखवला, हा इतिहासाचा दाखला संपूर्ण जगासाठी कायम आदर्श ठरणार आहे, असे मत रावत यांनी व्यक्त केले. एक सुंदर, कृतिशील आणि दिशादर्शक असा हा उपक्रम आहे. जगातले महान राजा शिवाजी महाराज आहेत त्यांची तुलना करण्यासारखे कोणीही नाही. जगाला मार्ग दाखविणारे आदर्श म्हणजे शिवाजी महाराज आहेत असे डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले. कार्यक्रमात जपानमधील इडीगोवा इंडियन कल्चरल सेंटरचे विश्वस्त योगेंद्र पुराणिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनोगत व्यक्त केले. याशिवाय शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांनी शिवकालीन युद्ध कला सादरीकरण, राम देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटन केले. भक्ती गुरुकुल भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले. केशव शंखनाद पथकाने शंखवादन केले तर आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.