Pune : ड्रेनेज लाईनचे काम करताना अंगावर माती पडून कामगाराचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम करत असताना, सिमेंट पाईपवर पडलेली माती काढण्यासाठी खड्ड्यात उतरलेल्या एका कामगाराचा अंगावर माती पडून मृत्यू झाला. शंकरप्पा वाचप्पा राठोड (३७ ,रा. मांगडेवाडी,कात्रज) असे त्याचे नाव आहे.
दरम्यान, निर्धारित नियमानुसार कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची उपायोजना न करता, कामगाराची सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर कंपनी एन्विरो कंट्रोल प्रा. लि. चे मालक, ठेकेदार दामु होबन्ना राठोड (५६), जेसीबी चालक एम.डी. अन्जारुल (२५, रा. बालाजीनगर), साईट सुपरवाझयर पोमान्ना मोवनीश पवार (२५) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भाऊ मुक्काण्णा वाचप्पा राठोड (४५, रा. मांगडेवाडी,कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार बालेवाडी येथे बुधवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबीने माती काढल्यामुळे सिमेंटच्या पाईपवर माती पडलेली होती. जेसीबी चालकाने शंकरप्पाला माती काढण्यासाठी खड्ड्यात उतरवले. त्यावेळी खड्ड्याच्या बाजूला असलेल्या भिंतीचा कडा शंकरप्पाच्या अंगावर पडला.
त्यामुळे तो गाडला गेला. मातीच्या ढिगार्याखालून त्याला काढत असताना, पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यातआले होते. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल केकाण करीत आहेत.



