Pune: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती

पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून हा रस्ता ८४ मीटर रुंद करण्याचा प्रारंभिक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तांत्रिक बाबीतून तो ५० मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या भूसंपादनासाठी आवश्यक ४७० कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडून सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा रस्ता २०२६च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता मिळाली. मात्र, भूसंपादन विलंबामुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला. यातून ८४ मीटर रुंदीचा रस्ता खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला.
या रुंदीकरणासाठी शासनाकडून महापालिकेला १४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, तर महापालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी पालिकेने शासनाकडे आणखी ४८० कोटींची मागणी केली होती. मात्र, निधीस उशीर झाल्याने पालिका प्रशासनाने आपल्याकडील निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यासाठी एकूण ९४ हजार चौरस मीटर जमिनी पैकी आतापर्यंत ४६ हजार ४५६ चौरस मीटर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनासाठी पालिकेकडून टीडीआर देण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी अनेक जमीन मालकांकडून मोबदला रोख स्वरूपात देण्याची मागणी होत आहे.
या भूसंपादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून कात्रज-कोंढवा रस्त्याचाही त्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीवर नियमित आढावा घेतला जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
‘कात्रज-कोंढवा रस्ता ५० मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूसंपादनासाठी लागणारी ४७० कोटी रुपयांची रक्कम सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली जाईल. भूसंपादन तातडीने पूर्ण करून हा रस्ता २०२६ च्या डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.’- नवल किशोर राम, महापालिका आयुक्त.





