Pune: पोलिसांच्या सहकार्यासाठी महिलांचा पुढाकार

पुणे : पोलीस मित्र संघटना (महाराष्ट्र राज्य) महिला विभागातील महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे आयोजित केला. पुणेकरांसाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी महिलांचा पुढाकार असावा, या संकल्पेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अध्यक्ष राजेंद्र कपोते, संघटनेच्या सरचिटणीस बॉबी करनानी, कर्नल महादेव घुगे या वेळी उपस्थित होते. बॉबी करनानी यांनी प्रास्ताविक केले. पुणे शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला, युवती यांना कपोते, कर्नल घुगे, प्रकाश करनानी यांच्या हस्ते संघटनेचे ओळखपत्र देण्यात आले.
पोलिसांना सहकार्य करण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. ही आपल्या संघटनेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या पोलिसांवर कामाचा भार असतो, जबाबदारी असते. त्यासाठी महिला नागरी कर्तव्य समजून मदत करणार आहेत. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना ओळखपत्र दिल्यावर त्या पुण्यनगरीसाठी हातभार लावतील, असे कपोते म्हणाले.




