पुणे : महिला आयोगाचा उपक्रम दिलासादायक

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन
पुणे – महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी राबविण्यात येत असलेला “महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे शहर भागासाठीच्या सुनावणीस प्रारंभ करण्यापूर्वी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, महिला आयोगाच्या सदस्या ऍड. संगीता चव्हाण, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होत्या.
यावेळी चाकणकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. सुनावणीदरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम राज्य महिला आयोगाकडून होणार आहे.





