Pune : रुपाली चाकणकर समर्थक तरुणीकडून महिलेस धमकी; वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरण…

पुणे : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वेळेत दखल न घेतल्यामुळे वैष्णवीला टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी एका महिलेला फोन करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भात संगीता भालेराव यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलिस आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संगीता भालेराव यांनी फेसबुकवर रुपाली चाकणकर यांच्या कामकाजावर टीका करीत पोस्ट केली होती.
यानंतर सोनाली गाडे यांनी त्यांना फोन करून ती पोस्ट हटवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ व धमकी दिली, असा आरोप भालेराव यांनी केला आहे. त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले की, वैष्णवी हगवणे प्रकरणाने मन हेलावून गेले. तिला न्याय मिळावा हीच माझी भूमिका होती.
परंतु, सोनाली गाडे हिने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असून, अश्लील भाषेचा वापर करीत मानसिक त्रास दिला. त्यांनी दावा केला की, गाडे यांनी एकूण १८ वेळा कॉल केला आणि फेसबुक पोस्ट हटवण्यास जबरदस्ती केली.




