Pune: शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश मिळणार का?

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शासकीय, अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला. या निर्णयाची यंदापासून अंमलबजावणी करावीच लागणार आहे. मात्र, यासाठी शिक्षण विभागाकडून सूक्ष्म नियोजन केलेले दिसत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेशाचे वाटप होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मोफत गणवेश योजनेच्या माध्यमातून शासनाच्या वतीने शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. या गणवेशाची रचना स्काऊट व गाइड विषयास अनुरूप आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेला सारख्याच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने घेतले जाणार होते. पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत समान रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने मोफत गणवेश योजनेबाबत संबंधित शाळा व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातील. मात्र, गणवेशासाठी काही कालावधीची प्रतिक्षाच करावी लागणार असल्याची सद्यस्थिती आहे.
नियोजन अजूनही नाही
शासनाने कापड विकत घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने गणवेश शिवून घेण्याचे ठरवण्यात आले. १५ जूनपासून शाळा सुरू आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यास आठ दिवस बाकी असताना अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शिक्षण विभागाचे विशेष काही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.





