Pune : विमान प्रवासी खटला दाखल करणार?

पुणे : पुणे विमानतळावरून लखनऊसाठी रात्री १२ वाजता उड्डाण करणारे विमान पहाटे पावणेसात वाजता उड्डाण झाले. जवळपास पावणेसात तास विमान उड्डाणाला उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांची पूर्ण रात्र विमानतळावर गेल्यामुळे आणि संबंधित विमान प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे याबाबत ग्राहक आयोगात तक्रार दाखल करणार असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
पुणे ते लखनऊ ६ ए ०३३८ हे इअर इंडियाचे विमान दि. ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी पुणे विमानतळावरून उड्डाण होणार होते. मात्र, काही कारणास्तव ते रद्द झाले आणि दि. १२ एप्रिल रात्री १२ वाजून १० मिनिटांनी विमान उड्डाण होईल, असे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे विमान उड्डाणाच्या आधी प्रवासी रात्री जवळपास दहा वाजता पुणे विमानतळावर आले. त्या वेळी विमानाला दोन तास उशीर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आणखी तीन तास, चार तास उशीर होणार असल्याचे मेसेज आले आणि रात्री १२ वाजून १० मिनिटांनी उड्डाण करणारे विमान सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण करेल, असे जाहीर करण्यात आले. मुळात विमान रद्द झाल्यानंतर रिशेड्युलर करत बारा तासाने विमान उड्डाण होईल, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही सहा पावणेसात तास उशिराने विमान उड्डाण झाले असून, प्रवाशांना तब्बल १८ तास ताटकळावे लागल्याने मनस्ताप झाला.
या विमानाने पुण्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे काही कार्यकर्ते लखनऊ येथे बैठकीसाठी जाणार होते. त्यामध्ये सूर्यकांत पाठक, विजय सागर, धनंजय गायकवाड, वीणा दीक्षित आदींचा समावेश आहे. पुणे-लखनऊ विमानाला उशिर झाल्याने सर्व प्रवाशी प्रचंड चिडले होते. या प्रवासात काही प्रवाशांची कनेक्टिंग फ्लाइट होती. एक प्रवासी त्यांच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय सागर यांनी आम्ही ग्राहक न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.
दुपारी १२ वाजता उड्डाण रद्द करून रात्री १२ वाजता विमान उड्डाण करणार होते. म्हणून रात्री १० वाजता आम्ही विमानतळावर आलो. त्यांनतर आधी दोन तास, नंतर तीन असे सांगण्यात आले. चाैकशी केल्यावर कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण झाले. आम्ही सर्व ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.
-सूर्यकांत पाठक, ग्राहक पंचायत व प्रवासी




