पुणे : सॅनिटरी नॅपकीन थेट शासकीय संस्थेकडून घेणार ?; निविदा प्रकरण दक्षता विभागाकडे

पुणे : महापालिका शाळांमधील वयात आलेल्या मुलींच्या आरोग्य सुरक्षेसाठी महापालिकेकडून मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यात येतात. मात्र, करोनामुळे तीन वर्षे आणि मागील वर्षी ठेकेदारांच्या वादामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. या वर्षीही या निविदांवरून वाद निर्माण झाल्याने या निविदा प्रक्रीयेची तपासणी दक्षता विभागाकडून करून घेण्यात येणार आहे. तसेच, हा वादातून तोडगा काढण्यासाठी या नॅपकिनची खरेदी थेट शासकीय संस्थेकडून केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकने यांनी दिली.
महापालिका सुमारे 50 लाख रूपयांचे नॅपकीन खरेदी करते. मात्र, निविदांवर मोठया प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत असल्याने त्याचा सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या 8 ते 10 हजार मुलींना बसत आहे. महापालिका या मुलींना वर्षभरासाठी हे नॅपकीन पुरविते.
चार वर्षे पुरवठाच नाही..
महापालिकेकडून दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात मुलींना हे नॅपकीन पुरविले जातात. मात्र, 2020 पासून हे नॅपकीन देण्यात आलेले नाहीत. 2022 पर्यंत करोनामुळे शाळा बंद असल्याने महापालिकेने ही खरेदी केली नाही. त्यानंतर मागील वर्षी नॅपकीन पुरविणाऱ्या ठेकेदारांमध्ये वाद झाल्याने मोठया प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाल्याने निविदा रद्द करण्यात आल्या.
यंदाही पुन्हा तीच स्थिती असून या निविदेत रिंग झाली असून ठराविक ठेकेदारानांच पात्र केल्याच्या लेखी तक्रारी आमदार तसेच खासदारांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निविदांची तपासणी दक्षता विभागाकडून करून घेण्यात येणार असून त्यात, गैरप्रकार आढळल्यास शासकीय संस्थाकडून थेट खरेदी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकने यांनी दिली.




