Pune : नाला सफाईच्या निविदा एवढ्या कमी दराने का ?

पुणे : धनकवडी, भवानी पेठ आणि कसबा विश्रामबागवाडा या तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले-पावसाळी वाहिन्यांच्या सफाई निविदा कमी दराने आल्या असून खरोखर ठेकेदार कमी दराने काम करणार आहेत का याचे स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी मागवले आहे.
शहरातील नाले तसेच पावसाळी वाहिन्यांच्या साफसफाईच्या तब्बल ५० ते ५५ कोटींच्या कामांना अगोदर मान्यता दिली होती. शेवटच्या निविदांना तब्बल ५४ टक्के कमी दराने मान्यता दिल्यानंतर आता शेवटच्या तीन निविदा बाकी राहिल्या आहेत. धनकवडी, भवानी पेठ आणि कसबा विश्रामबागवाडा या तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदांना पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ब्रेक लावला आहे. या तीन निविदा १२ ते २५ टक्के कमी दराने का आल्या आहेत, तसेच खरचं या कमी दरात ठेकेदार काम करणार का ? याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
शहराच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी नालेसफाई, चेंबर सफाई तसेच पावसाळी वाहिन्यांच्या सफाईच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश क्षेत्रीय कार्यालयांच्या तीनही निविदा झाल्या असून कामही सुरू झाले आहे. या निविदा जवळपास ३५ ते ५४ टक्के कमी दराने आलेल्या आहेत. विशेष म्हणजे ही बाब माध्यमांनी निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाने शक्य तेवढ्या लवकर या निविदांना मान्यता दिली होती. त्यानंतर प्रशासनावर मोठी टिका झाली.
या निविदा कशा बरोबर आहेत याचा खुलासाही आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केला. आता शुक्रवारी धनकवडी, भवानी पेठ आणि कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या तीन निविदा मान्यतेसाठी ठेवण्यात आल्या. मात्र, आधीच्या निविदांमध्ये खरचं काम होते का ? निविदा एवढया कमी दराच्या का आल्या अशा प्रश्नांची सरबत्तीच आयुक्तांनी प्रशासनावर केली. तसेच, स्पष्टीकरण आल्याशिवाय निविदाच मान्य करण्यात येणार नसल्याची भूमिका घेतल्याने अधिकारीही चक्रावून गेले.
मान्यते आधीच सुरूवात ?
या निविदा मान्य होण्याआधीच या तीनही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या निविदांमध्ये सर्वात कमी दर आलेल्या ठेकेदारास ही कामे मिळतील या भरवशावर त्यांना काम सुरू करण्यास सांगण्यात आले. ते ठेकेदारही प्रस्ताव मान्य होतील, या भरवशावर स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर बसून होते. मात्र, आयुक्तांनी निविदा पुढे ढकल्याने आता काम सुरू करण्यास सांगण्यात आलेले ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.





