PUNE : रस्ते दुरुस्तीचे ‘डांबर’ नेमके जिरतेय तरी कुठे?

पुणे – महापालिकेने गेल्या सहा वर्षांत रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 2,100 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था प्रत्येक पावसाळ्यात कायम असून रस्त्यावरील खड्डे पुणेकरांची पाठ सोडण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्यावर टाकलेलं डांबर नेमकं कुठं जिरतंय? असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत.
रस्ते दुरुस्तीसाठी झालेला हा खर्च केवळ मनपाच्या मुख्य खात्याने केलेला असून त्यासोबतच वॉर्ड व प्रभागासाठी अंदाजे 176 कोटी रुपये रस्त्यासाठी व 300 कोटी रुपये मेंटेनन्ससाठी पाच वर्षांत असा खर्च झालेला आहे. अंदाजपत्रकात रस्ते कामांसाठी केलेली तरतूद, प्रत्यक्षात खर्च याची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून तपशील जाहीर करण्यात यावा, अशी मागणी “आपले पुणे’ संस्थेने राज्यशासन तसेच महापालिकेकडे केली आहे. तसेच ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही जाहीर करावी, अशी मागणीही आपले पुणेचे माजी विरोधीपक्ष नेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.
पालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात रस्त्यांसाठी तरतूद केली जाते. त्यातून दरवर्षी खर्चही केला जातो. मात्र, तरीही शहरातील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यात जातात. नवीन केलेल्या रस्तांवरही खड्डे पडतात. त्यावर पुन्हा दुरुस्तीसाठी पैसे जातात. त्यामुळे हे प्रकार थांबले पाहिजेत. तसेच यापूर्वीच्या कामांची माहिती नागरिकांसाठी जाहीर केली पाहिजे.
– उज्व्वल केसकर, माजी विरोधीपक्षनेते, महापालिका
लॉकडाउनमध्येही रु. 800 कोटींचा खर्च
“आपले पुणे’ संस्थेने सांगितलेल्या खर्चाच्या आकडेवारीनुसार, “महापालिकेने सन 2020 आणि 2021 या दोन वर्षांत रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल आठशे कोटींचा खर्च केला आहे. या काळात करोनामुळे शहरात दीड वर्षे निर्बंध होते. या कालावधीत शहरात जवळपास 8 महिने रस्ते, तसेच शहरातील इतर खोदाईची कामेही बंद होती. या कालावधीत सलग दोन वर्षे आयुक्तांनी अत्यावश्यक कामे वगळता इतर कामांना मनाई केली होती. मात्र, तरीही रस्ते आणि खड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे वास्तव आहे.’
वर्षनिहाय खड्डे दुरुस्तीवर झालेला खर्च (रुपये)वर्ष रक्कम
2017-18423 कोटी
2018-19438 कोटी
2019-20305 कोटी
2020-21453 कोटी
2021-22361 कोटी
2022-23200 कोटी





