Pune Weather Update : थंडीचा मुक्काम संपला? पुण्यात किमान तापमानात मोठी वाढ; पुढील ३ दिवस कसे असतील?
Pune Weather Update : पहाटेचा गारवा ओसरला आणि रात्रीचा उकाडा वाढला; दुपारी ढगाळ वातावरणामुळे पावसाची धास्ती.

Pune Weather Update – गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. शुक्रवारी (दि. २०) शिरूर येथे किमान तापमान १४.८ तर एनडीए परिसरात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे पहाटेचा गारवा आणि धुके कमी झाले असून, रात्री उकाडा वाढला आहे.
मागील आठ दिवसांपासून शहरासह उपनगरात कमाल व किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने पहाटे गारवा, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा गारवा असा अनुभव पुणेकर घेत आहेत. मात्र, गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमानात दोन अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यामुळे १२ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान १५ अंशावर पोहचले.
३२ अंशावरील कमाल तापमान आज ३४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आज दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. दुपारी तीननंतर शहरातील काही भागात ढगाळ वातावरण होते, तर काही भागात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वाटत होती. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, कमाल व किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.




