Pune Weather: मान्सून गायब? पुणे जिल्ह्यात पावसाची दांडी; उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण
Pune Weather: गेल्या २४ तासांत घाटमाथ्यासह धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी; पुणेकर आणि शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत.

Pune Weather – मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शहर परिसरात पावसाने दोन दिवस हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने अचानक घेतलेल्या विश्रांतीमुळे गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरवातीला ३१ अंशांपर्यंत खाली आलेला पारा शुक्रवारी (दि. २६) ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. परिणामी, शहरात दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.
शुक्रवारी शहरातील दापोडी, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, चिंचवड या परिसरात कमाल तापमान ३४ ते ३५ अंशापर्यंत पोहचले. त्यामुळे सकाळपासून आकाश निरभ्र आणि उन्हाचा चटका जाणवू लागला. एन पावसाळ्यात उन्हाचा चटका नकोसा झाला असून, पुणेकरांसह शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. शहराच्या मध्यभागात पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहे.
आज दिवसभरात इंदापूर तालुक्यासह राजगुरूनगर आणि शिरूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पुणे शहरालगतच्या दापोडी परिसरातही काही वेळ पाऊस झाला. गेल्या २४ तासांत घाटमाथ्यासह धरणक्षेत्र परिसरातही पावसाचा जोर कमी झाला आहे. दिवसभरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील दोन ते तीन दिवस शहरात आकाश प्रामुख्याने अंशतः ढगाळ राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या हवामान बदलांमुळे मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.





