Pune Weather : फेब्रुवारीतच मे महिन्याचे चटके? पुण्यात उष्णतेचा पारा चढला; वेधशाळेने दिला ‘हा’ इशारा
Pune Weather : शहरासह उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे

Pune Weather – शहरासह उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी कमाल तापमान नोंदीकडे वाटचाल असून, लोहगाव आणि कोरेगाव पार्क येथे शनिवारी (दि. २१) कमाल तापमान ३६ अंशापर्यंत पोहचले.
या महिन्यात पहिल्यांदाच ३५ अंशाच्या पुढे कमाल तापमान गेले असून, अन्य परिसरातही उष्णतेचा पारा ३४ ते ३५ अंशाच्या पुढे नोंदविला आहे. शहरासह जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे बहुतांश भागातून थंडी गायब झाली असून, जिल्ह्याच्या काही ठिकाणी पहाटे आणि रात्री हलकीसी थंडी जाणवत आहे. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून शहरासह उपनगरातील कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
मागील आठवड्यात शहरातील कमाल तापमान २९ अंशापर्यंत खाली नोंदविले. तर आज उष्णतेचा पारा ३६ अंशावर जाऊन पोहचला असून, यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाच्या चटक्याने उन्हाळ्याची चाहूल लागली असून, यंदाचा उन्हाळा चांगलाच तापवणार असे दिसते. गेल्या २४ तासांत शहरातील कमाल व किमान तापमान एक ते दोन अंशाने वाढ झाली.
तर काही ठिकाणी अडीच ते तीन अंशाने वाढ झाल्याचे दिसून येते. लोहगाव परिसरात सर्वाधिक ३६, तर कोरेगाव पार्क येथे ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर परिसरात ३४.६, चिंचवड येथे ३४.१ तर एनडी परिसरात ३३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
किमान तापमानही १२ अंशावरून १४ ते १६ अंशावर पोहचले आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, कमाल व किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.




