पुणे : शहराच्या नगर रस्ता परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेला वीज पुरवठा करणाऱ्या केबल मध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे नगरस्ता परिसरातील सहा ते सात लाख पुणेकरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. धरणाच्या ठिकाणी असलेल्या जॅकवेलला वीज पुरवठा करणारी ही केबल असून दुपारी बाराच्या सुमारात हा बिघाड झाला होता. त्यानंतर रात्री उशीरा पर्यंत दुरूस्तीचे काम सुरू असल्याने बुधवारी दुपार नंतरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, गुरूवारीही अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत राहण्याची चिन्हे आहेत. भामा- आसखेड धरणातून दैनंदिन २०० एमएलडी पाणी घेतले जाते. हे पाणी विश्रांतवाडी, कळस, धानोर, टिंगरेनगर, लोहगाव, येरवडयाचा काही भाग, विमाननगर, तसेच वडगावशेरीच्या काही भागास पाणी पुरवठा केला जातो. मात्र, बुधवारी दुपारी या जलकेंद्राच्या जॅकवेलला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाला. सुरुवातीला हे काम तीन तासात पूर्ण होईल असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात रात्री नऊ पर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे महापालिकेस आवश्यक असलेले पाणी घेता न आल्याने दुपारनंतरचा पाणी पुरवठा बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली. वडगावशेरी, खराडी भागातही पाणी पुरवठा विस्कळीत भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेचे पाणी बंद असतानाच वडगाव शेरी आणि खराडी भागाचा पाणी पुरवठाही विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. मागील आठवडयात शुक्रवारी या भागात पाणी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर, शनिवारी लष्कर जलकेंद्राची जलवाहिनी फुटल्याने सलग दोन दिवस या भागात पाणीच आले नाही. तर दोन दिवस पाणी नसल्याने रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा झालेला असतानाच सोमवारी या भागाचे पाणी मुंढव्याकडे वळविण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सोमवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. त्यामुळे नगर रस्त्याच्या दोन्ही भागाच्या परिसराचा पाणी पुरवठा आठवडया भरापासून विस्काळीत झाला आहे. या भागासाठी महापालिकेकडून पर्वती जलकेंद्रातून काही पाणी वळविण्यात आले. त्यामुळे कोथरूड आणि औंध तसेच मध्यवर्ती पेठांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यातच, उन वाढल्याने पाण्याची मागणी वाढली असून, पाणी पुरविताना महापालिकेची दमछाक होताना दिसते आहे.