Pune : पावसाळी वाहिनीच्या खड्ड्यांत पाणी; पुणे-सातारा रस्त्यावरील काम अपूर्ण

कात्रज – कात्रज चौकापासून पुढे सातारा रस्त्यावर सुरू असलेल्या पावसाळी वाहिनीचे काम संथगतीने सुरू असून अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांतच पावसाचे पाणी साचले आहे. यातून अपघाताचा धोका असल्याने महापालिका प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सातारा रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुरुवातीला पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या कामाच्या ठिकाणी रस्त्याकडेला खोदलेली वाहिनी, अर्धवट पडलेले सिमेंटचे ब्लॉक आणि जागोजागी पडलेले खड्डे यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
रस्त्यालगत सिमेंटच्या ब्लॉक्सचा साठा करून ठेवला असला तरी, प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसून येत आहे. काम चालू आहे, असे बोर्ड लावले असले तरी काम मात्र बंद आहे. कात्रज चौकातून वेगाने येणारी वाहने गंधर्व लॉन्स परिसरात बॉटलनेक सारख्या परिस्थितीमुळे अडकून पडत आहेत.
या नियोजन शून्य कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सातारा रस्त्यावर पावसाळी वाहिनीचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत पावसामुळे या कामाला विलंब होत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर कामाला गती मिळेल. त्यानंतर दहा फूट रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. – दिलीप पांडकर, उपअभियंता, पथविभाग, महापालिका.





