ठरलं..!१ फेब्रुवारीला जाहीर होणार पुण्याची प्रभाग रचना; प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा

पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. प्रभागरचनेचा प्रारुप आरखडा मंगळवारी (दि. १) प्रसिद्ध केला जाणार आहे. या आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी तसेच सूचना करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या हरकतींवर २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून २ मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
महापालिकेची मुदत १३ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. सुरुवातीला प्रभागरचना केली जाणार असून त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, प्रभाग रचना मार्च मध्ये होणार असल्याने निवडणुका एप्रिल अखेर अथवा मे महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट आहे. तसेच १४ मार्च पासून महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.
आयोगाच्या आदेशानुसार आता प्रभागरचना अंतिम करण्याच्या कार्यवाहील सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेची सन २०२२ ची सार्वत्रिक निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार असून त्याबाबतचा प्रारुप १७३ पदासाठी ५८ प्रभाग असणार आहेत. त्यात ५७ प्रभाग ३ चे तर १ प्रभाग २ सदस्याचा असणार आहे. प्रभाग रचनेचा आराखडा महापालिका प्रशासनाने २० जानेवारी २०२२ रोजी आयोगाला सादर केला होता. आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक १३ हा दोन सदस्याचा असणार आहे.
असा आहे आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम
* निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे (मंगळवार दि. 1 फेब्रुवारी 2022)
* प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी (दि. 1 फेब्रवारी ते 14 फेब्रुवारी 2022)
* प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे
(दि. 16 फेब्रुवारी 2022)
* राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक (26 फेब्रुवारी 2022)
* सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक (2 मार्च 2022)





