पुणे : नकाशे,अधिसूचनेत फरक; प्रभाग रचनेबाबत हरकती नोंदविणार तरी कशा

पुणे- महापालिकेने जाहीर केलेले प्रभाग रचनेचे नकाशे आणि प्रभाग रचनेची जाहीर केलेली अधिसूचना यात तफावत असून त्यामुळे हरकती घेता येणार नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने नकाशे योग्य आहे की गॅझेट, याचा खुलासा करावा अशी मागणी माजी विरोधीपक्ष नेते उज्जवल केसकर यांनी केली आहे.
केसकर म्हणाले की, महापालिकेने जाहीर केलेले प्रभाग रचनेचे नकाशे संकेतस्थळावर आहेत. त्याच वेळी गॅझेटही जाहीर झाले आहे. मात्र, नकाशात आणि गॅझेट मध्ये दर्शविण्यात आलेल्या हद्दी चुकीच्या आहेत. शहरातील अनेक प्रभागांमध्ये हेच चित्र असून नेमकी हद्द लक्षात येत नाही. त्यामुळे हरकत नोंदवायची असल्यास ती नकाशा गृहीत धरून नोंदवायची की गॅझेट याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे नेमके काय चुकले आहे, हे पालिकेने आधी जाहीर करावे. त्यानंतरच हरकती नोंदविता येतील. तसेच, या चुका समजल्या नाहीत तर प्रभागांची हद्द बदलून त्याचे परिणाम आरक्षणावर तसेच इतर प्रभागांच्या रचनेवरही होतील. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी केसकर यांनी केली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. याविरोधात अनेकांनी न्यायालयाचे दार ठोठावण्याचीही तयारी असल्याचे सुनावले आहे. त्यामुळे हरकती आणि सूचनांची संख्याही अधिक असणार असा अंदाज बांदला जात आहे. परंतु, नकाशे, अधिसूचनेत फरक असल्याने यात अडथळा येऊ शकतो.





