Pune : कर्करोग जनजागृतीसाठी “वॉल ऑफ होप’ उपक्रम

पुणे : टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरने डॉक्टर आणि कर्करोगावर मात केलेले रुग्णांच्या मदतीने “वॉल ऑफ होप’चे अनावरण केले. कर्करोगाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण जागरूकतेचे पाऊल उचलून वेळीच उपचार आणि निदानाचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले. “कर्करोगाने हार मानणार नाही; जीवनाची ही लढाई जिंकणार’ असा प्रेरणादायी संदेश देत जनजागृती केली.
यावेळी सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख, विभाग प्रमुख डॉ. संतोष साहू, संचालक डॉ. रवी वाटेगावकर, डॉ. गौरव जसवाल, डॉ. प्रशांत चंद्रा, डॉ. अभिषेक पुरकायस्थ, डॉ. ज्योती मेहता, डॉ. सारंग वाघमारे, डॉ. विश्वास कौल यासह कर्मचारी आणि रूग्ण उपस्थित होते.
कर्करोग हा देशातील आरोग्यविषयक चिंतेचा विषय आहे, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे आणि निदानास विलंब हे मृत्युचे प्रमुख कारण ठरत आहे. चुकीची जीवनशैली, प्रदूषण, तंबाखूचे सेवन आणि अनुवांशिक घटक कर्करोगास कारणीभूत ठरतात. जागरूकता, वेळोवेळी तपासणी आणि प्रगत उपचारांची उपलब्धता हे अत्यंत महत्त्वाची असल्याचे कर्करोगतज्ज्ञांनी सांगितले.
सचिन देशमुख म्हणाले, “टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये रुग्णांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात उपचार आणि प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहोत. रुग्ण, त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी “वॉल ऑफ होप’ नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. सेंटरमधील अत्याधुनिक उपचार सुविधा, कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे रुग्णांची सर्वोत्तम काळजी घेतली जाते.
नियमित तपासणी, योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे वेळीच निदान झाल्यास, यशस्वी परिणामांसह कर्करोगाचे व्यवस्थापन करता येते. “वॉल ऑफ होप’ हे आशेचे प्रतीक आहे.
– डॉ. संतोष साहू, टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर





